Pune : हडपसरमधील गंगा पेट्रोल पंपावर दुचाकी चालकाला जीवे मारण्याची धमकी

हडपसर :  प्रतिनिधी –   हडपसर (15 नंबर, मांजरी फाटा) येथील गंगा पेट्रोल पंपावर दुचाकीमध्ये पेट्रोल भरल्यानंतर कमी आल्याचे पत्रकारांनी सांगितले. त्यावरून येथील कर्मचाऱ्याने शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. हा कर्मचारी मद्यपान केलेला होता. हा प्रकार बुधवारी (दि. 16) सायंकाळी साडेसात-पावणेआठच्या सुमारास घडला.

नवनाथ गोरख म्हस्के (वय 52, रा. साडेसतरानळी, भुजबळवस्ती, हडपसर) याच्यावर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पत्रकार अशोक बालगुडे यांनी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बालगुडे गंगा पेट्रोल पंप (15 नंबर, मांजरी फाटा, हडपसर) येथे सायंकाळी साडेसातच्या सुमारास पेट्रोल भरण्यासाठी गेले होते. मात्र, पेट्रोल भरल्यानंतर कमी आल्याचे कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी शेजारी असलेल्या म्हस्के याने दमदाटी करत शिवीगाळ करून अग्निरोधक सिलिंडर डोक्यात घालून मारण्यासाठी धावत गेला. त्यानंतर हडपसर पोलीस स्टेशनला येऊन सांगितल्यानंतर पोलीस पेट्रोल पंपावर बालगुडे यांच्याबरोबर गेले. त्यावेळीसुद्धा त्याची शिवीगाळ सुरूच होती. यावेळी पंपावर जबाबदार व्यक्ती म्हणून व्यवस्थापक किंवा दुसरे कोणीही नव्हते. पोलिसांनी व्यवस्थापकाला बोलावण्यास सांगितल्यानंतर मालक आणि व्यवस्थापक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासमोर आणि पोलीस स्टेशनमध्येही म्हस्के याची धमकी देणे सुरूच होते.