Bhosari News : एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भोसरी/पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भरधाव वेगात जाणाऱ्या एसटी बसची धडक दुचाकीला बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी (दि.7) सकाळी पुणे-नाशिक महामार्गावरील जय गणे साम्राज्य चौकात झाला. किरण हनुमंत अमराळे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी एसटी चालकाविरुद्ध भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रमेश गोपीनाथ डमाळे (वय-47 रा. साई खिंडी, पोस्ट चिकणी, जि. अहमदनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. याप्रकरणी मयत किरण याचे काका चंद्रकांत नानाभाऊ अमराळे (वय-43 रा. किवळे मळा, पंतनगर, जाधववाडी चिखली मुळ गाव दावडी, ता. खेड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत किरण हा गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास आपल्या दुचाकीवरुन (एमएच 14 जीझेड 3503) पुणे नाशिक महामार्गावरु बाणेरकडे जात होता. त्यावेळी पाठिमागून आलेल्या एसटी बसची (एमएच 06 एस 8468) जोरात धडक किरणच्या दुचाकीला बसली. या धडकेत किरण गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक आर.बी. जाधव करीत आहेत.