अबब ! दुचाकीस्वारकडून केला 42 हजार 300 रुपयांचा दंड ‘वसुल’, 108 वेळा केला नियमांचा ‘भंग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील वाहतूकीच्या नियमांचे सर्वाधिक १०८ वेळा उल्लंघन केलेल्या दुचाकी मोपेडचालकाकडून वाहतूक पोलिसांनी तब्बल ४२ हजार ३०० रुपये दंडाची रक्कम वसुल केली आहे. शहर वाहतूक शाखेने १२ फेब्रुवारी रोजी वाहतूक नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या  टॉप १०० वाहनचालकांची यादी जाहीर केली होती. त्यात बिबवेवाडी येथील एका मोपेडचालकाने सर्वाधिक तब्बल १०८ वेळा नियमभंग केल्याचे दिसून आले होते. त्यांना ४२ हजार ३०० रुपये दंड झाला होता. वाहतूक पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन हा दंड वसुल केला.

एका कारचालकाने ६५ वेळा वाहतुक नियमांचे उल्लंघन केले होते. त्यांच्याकडून १३ हजार २०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे. ज्या वाहनचालकांनी जास्तीतजास्त वाहतूक नियमांचा भंग केला आहे, त्यांच्या घरी पोलीस जाणार असून त्यांच्याकडून दंड वसुल करण्यात येणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे.

या मोपेडचालकाने ४२ हजार ३०० रुपये दंड भरला. मात्र, आज त्यांनी त्यांची ही मोपेड विकली तरी तिला इतकी किंमत मिळण्याची शक्यता नाही. वाहतूक शाखेने जाहीर केलेल्या टॉप १०० मधील सर्वात शेवटच्या क्रमांकावर असलेल्या वाहनचालकाने ४४ वेळा नियमभंग केला आहे. तर एका कारचालकाला सर्वाधिक ७० हजार रुपये दंड झाला आहे.