‘पॅन कार्ड’मुळे दुचाकी चोर चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन – गाडीच्या पेट्रोल टाकीच्या कव्हरमध्ये असलेल्या पॅन कार्ड आणि आधार कार्डमुळे दुचाकी चोरणारे चोरटे चिंचवड पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या ८ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींनी चिंचवड, भोसरी, हिंजवडी परिसरातून दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

अंकुश बालाजी क्षीरसागर (रा. परभणी सध्या रा. कस्पटे वस्ती वाकड), प्रदिप संजय माळी (रा. कोल्हापुर सध्या रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पॅशन प्रो, मेस्ट्रो, शाईन, अ‍ॅक्टिवा, स्प्लेंडर प्लस आणि डीओ अशा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
चिंचवड वाहतुक शाखेतील पोलीस हवालदार मारुती फलके हे महावीर चौकामध्ये कर्तव्यावर असताना एक तरुण दुचाकीवरुन संशय़ास्पदरित्या जाताना आढळून आला. त्याला थांबवून गाडीची कागदपत्रे मागितली असता गाडी (एमएच १४ ईव्ही ४३३४) मित्राची असल्याचे सांगून कागदपत्रे घेऊन येताे असे सांगून गाडी सोडून निघून गेला. मात्र, तो परत न आल्याने त्यांनी दुचाकी चिंचवड पोलिसांच्या स्वाधीन केली. चिंचवड तपास पथकाने गाडीची पहाणी केली असता गाडीच्या टाकीच्या कव्हरमध्ये पॅन कार्ड आणि आधार कार्ड मिळाले.

मिळालेल्या पॅन कार्डवरून पोलिसांनी अंकुश क्षीरसागर याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने त्याचा मित्र प्रदिप माळी याच्या मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी प्रदिप माळी याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दुचाकी चोरीची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ, परीमंडळ १ चे पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त रामचंद्र जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भिमराव शिंगाडे, चिंचवड वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे, पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वजीत खुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव, पोलीस हवालदार पांडुरंग जगताप, वाहतुक शाखेचे पोलीस हवालदार मारुती फलके, सुधाकर अवताडे, स्वप्नील शेलार, ऋषीकेश पाटील, नितीन राठोड, गोविंद डोके, अमोल माने, सचिन वर्णेकर, पंकज भदाणे यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त