पुण्यात पिस्तूलाच्या धाकाने दुचाकी पळवली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – लघुशंका करण्यासाठी थांबल्यानंतर पत्ता विचारण्याच्या बहाण्याने जवळ आलेल्या दोघांनी पिस्तूलाचा धाक दाखवून दुचाकीस्वाराची दुचाकी पळवून नेल्याची घटना बाणेर येथे आज पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी चतु: श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी संदिप कौशिक (वय ३२, रा. चिखली प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप कौशिक हे शुक्रवारी रात्री जेवण्यासाठी बाहेर गेले होते. त्यावेळी ते जेवण करून शनिवारी पहाटे एकच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून घराकडे जात होते. त्यावेळी ते बाणेर येथील नॅशनल इन्शुरन्स अकॅडमीच्या पुढे सर्विस रोडवर लघुशंका करण्यासाठी थांबले. त्यांनी दुचाकी लावून लघुशंका करत असताना विरुध्द दिशेने एका दुचाकीवरून दोघेजण पत्ता विचारण्याच्या बहाण्याने त्यांच्याजवळ आले. त्यांनी फिर्यादी संदिप कौशिक यांना त्यांची दुचाकी मागितली. परंतु त्यांनी ती देण्यास नकार दिला. मात्र त्यानंतर त्यांनी संदिप कौशिक यांना पिस्तूलाचा धाक दाखवला. तेव्हा ते तेथून घाबरून पळू लागले. तेव्हा चोरट्यांनी त्यांची दुचाकी लंपास केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बी. व्ही. धोडमिसे करत आहेत.