मौजमजेसाठी दुचाकी चोरणारा अल्पवयीन उत्तमनगर पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजेसाठी दुचाकी चोरत तीन ते चार दिवस वापरून सोडून देणाऱ्या इयत्ता आठवीत शिकाणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला उत्तमनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संबंधित मुलाकड़ून उत्तमनगर व हवेली पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे दोन गुन्हे पोलिसांनी उघडकिस आणले आहेत.

उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना एक अल्पवयीन मुलगा शिवणे स्मशानभूमीकडून गावाकडे काळ्या रंगाच्या मोपेडवर येत होता. त्या मोपेडला नंबर प्लेट नव्हती. त्यामुळे संशय आल्याने त्याला पोलिसांनी हटकले. तेव्हा त्याच्याकडे कागदपत्रांची चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. त्यावेळी त्याच्यावडीलांना पोलीस ठाण्यात बोलवून त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने जानेवारी महिन्यात नांदेड फाटा येथून दुचाकी चोरल्याचे सांगितले. याप्रकऱणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. तसेच त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर त्याने उत्तमनगर पोलीस ठाण्याच्या परिसरातील दुचाकी चोरून ती ३ ते ४ दिवस वापरून सोडून दिली होती. असे सांगितले. तो मनपाच्या शाळेत इयत्ता आठवीत शिकतो असेही त्याने सांगितले.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, पोलीस निरीक्षक ( गुन्हे) सतीश डहाळे, पोलीस उपनिरीक्षक के. के. कांबळे, पोलीस उपनिरीक्षक कोल्हे, सहायक पोलीस फौजदार वायदंडे, कर्मचारी सुर्यवंशी, पाटील, तनपुरे, ताकवणे, त्रिंबके यांच्या पथकाने केली.