दुचाकी चोरून तिचे सुटे भाग विकणारी टोळी गजाआड

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मुंबई शहर तसेच उपनगरामधून दुचाकी चोरून त्यांचे सुटे विकणाऱ्या टोळीला चेंबूर पोलिसांनी गजाआड केले. चेंबूर पोलिसांनी दोन लाख दहा हजार रुपयांच्या सात दुचाकी आणि सुटे भाग जप्त केले असून तिघांना अटक केली आहे.

चेंबूर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना एका निळ्या दुचाकीला पिवळी बॉडी लावलेली दुचाकी आढळली. या दुचाकीचे काही भाग, बॉडी ही तक्रारदाराच्या चोरीला गेलेल्या गाडीचे असल्याचे पोलिसांना समजले. त्यावरुन पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर त्यांना दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला.
पोलिसांनी सुरुवातीला स्कूटर मालक वसीम वकील अन्सारी याला ताब्यात घेतले.

त्याची चौकशी केली असता त्याने पाच हजार रुपये देऊन जाफर चौधरी या मॅकेनिक कडून बॉडी बसवून घेतल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी जाफरला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने मोहम्मद अन्सारी या मुलाच्या मदतीने दुचाकी चोऱ्या करून त्याचे भाग करुन काही भाग विकल्याचे सांगितले. तसेच भायखळा येथील जाकीर हुसेन सलमानी याच्याकडे गाडीच्या चेसी दिल्याचे कबूल केले.
या टोळीने चेंबूर, माहीम, गोवंडी, कुर्ला, माटुंगा धारावी, वडाळा, आर ए किडवाई मार्ग, टिळक नगर इत्यादी परिसरातून 11 दुचाकी चोरी केल्याचे कबूल केले. यातील सात दुचाकी आणि त्यांचे भाग ज्याची किंमत अंदाजे 2 लाख 10 हजार आहे, ही सर्व मालमत्ता हस्तगत केली असून पुढील तपास चेंबूर पोलीस करीत आहेत.