दुचाकीची ऊसाच्या ट्रॉलीला धडक, दुचाकीचा स्फोट होऊन पती-पत्नीचा मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – रस्त्यावर उभ्या असलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीची धडक बसली. धडक बसल्यानंतर दुचाकीचा स्फोट होऊन पती-पत्नी गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. या भीषण अपघातात दुचाकीच्या स्फोट होऊन ट्रॉलीतील ऊसाने पेट घेतला. हा अपघात मंगळवारी (दि.५) रात्री उशीरा कवठेपिरान मार्गावर महावितरण कार्य़ालयाजवळ झाला.

रमेश सुखमार निरवाणे (वय २८) आणि मयुरी रमेश निरवाणे (वय २५, रा कवठेपिरान, ता. मिरज) अशी अपघातात ठार झालेल्‍या पती पत्‍नीची नावे आहेत. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास रमेश आणि त्‍यांची पत्नी सांगलीहून कवठेपिरानकडे येत असताना महावितरण कार्यालयाजवळ रस्‍त्‍यावर ऊसाची ट्रॉली (MH – ०९, AL – 4685) उभा होती. अंधारात ट्रॉली दिसली नसल्याने त्‍यांची दुचाकी (क्र. एपी – ११ एजी – ७०९५) ट्रॉलीला धडकली. ही धडक इतकी जोरात होती की, दुचाकीचा स्फोट होऊन ट्रॉलीतील उसाला आग लागली. यात रमेश आणि मयुरी यांच्याही कपड्यांना आग लागली. गावातील ग्रामस्थांनी ती आग विझवून त्‍यांना पुढील उपचारासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपरापूर्वीच त्‍यांचा वाटेतच मृत्यू झाला.

रमेश आणि मयुरी यांचा विवाह होवून दहा वर्ष झाली आहेत. त्यांना अभिष निरवाणे (वय ८) आणि पार्श्व निरवाणे (वय ६) अशी दोन मुले आहेत. आई वडिलांच्या मृत्यूनंतर दोन्ही मुले पोरकी झाली. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडल्याने कवठेपिरानसह परीसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.