‘बिग बी’ अमिताभच्या चाहत्यावर हल्ला करणाऱ्या दोघांना अटक ! ‘जलसा’बाहेर घडली होती घटना

पोलिसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे मेगास्टार बिग बी अमिताभ बच्चन यांना पाहण्यासाठी आलेल्या एका तरुणावर 3 मद्यपींनी चाकूनं हल्ला केल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली होती. हा तरुण उत्तर प्रदेशातून मुंबईत आला होता. तक्रारदारानं असा दावा केला आहे की, दारू पिण्याच्या वादातून हा हल्ला झाला आहे. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी हा गुन्हा जुहू पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर आता जुहू पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली आहे. भाईंदर येथे राहणाऱ्या संजय गोपी खारवा उर्फ राजेंद्र उर्फ खिडकी आणि माटुंगा लेबर कॅम्पमध्ये राहणाऱ्या सुरेश कानजी खारवा यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

तक्रारदार मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवाशी

अकिल रफिक अहमद (35) असं तक्रारदाराचं नाव आहे. अकिल हा मूळचा उत्तर प्रदेशातील बरेलीतील ताईपुरी पोलीस चौकी परिसरात राहणारा आहे. अक्षय कुमार आणि बिग बी अमिताभ बच्चन यांचा मोठा चाहता असल्याचा दावा करत आहे.

नेमकं प्रकरण काय ?

अकिल 30 जून रोजी घरात कोणालाही न सांगता मुंबईला आला होता. त्या दिवसापासून तो रोज अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याबाहेर झोपत होता. पोलिसांना त्यानं तंस सांगितलं आहे. 4 जुलै रोजी अकिल भारती आरोग्य निधी हॉस्पिटलच्या फुटपाथवर झोपला होता. यावेळी आरोपी तिथं आले आणि अकिल एकटा आहे हे पाहून त्यांनी त्याला जबरदस्ती दारू पिण्यासाठी चल असा आग्रह केला. यानंतर त्यांनं विरोध करताच आरोपींनी त्याच्यावर हल्ला केला.

आधी झाली शाब्दिक चकमक, नंतर केला चाकूनं हल्ला

जेव्हा अकिलनं दारू प्यायला जाण्यास नकार दिला तेव्हा आरोपी आणि अकिल यांच्यात शाब्दिक चकमक झाली. शाब्दिक वादानंतर तीनही आरोपींनी अकिलवर चाकूनं हल्ला केला. यात अकिलच्या पोटावर, छातीवर आणि उजव्या दंडावर वार झाले. यात तो जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच अंधेरी पोलीसात तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. सध्या त्याच्यावर कूपर रुग्णालयात उपचार सुरू आहेत असं पोलिसांनी सांगितलं. अंधेरी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेत हा गुन्हा पुढील तपासासाठी जुहू पोलिसांकडे वर्ग केला होता. यानंतर जुहू पोलिसांनी या प्रकरणी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.