एकाच ‘वस्तादा’चे 2 पहिलवान ‘महाराष्ट्र केसरी’साठी ‘भिडणार’ ! पहिल्यांदाच ‘योग’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या शिष्याने महाराष्ट्र केसरी किताब पटकावावा, अशी इच्छा राज्यभरातील तमाम वस्तादांना असते. त्यासाठी ते आपल्या पठ्ठ्यांवर जीव तो मेहनत घेत असतात. पण यंदाचा महाराष्ट्र केसरी एका वस्तादासाठी आगळा वेगळा असणार आहे. बालेवाडी येथील क्रीडा संकुलात नाशिकचा हर्षवर्धन सदगीर आणि लातूरचा शैलेश शेळके यांच्यात मंगळवारी सायंकाळी लढत होत आहे. या दोघांचे वैशिष्ट्ये म्हणजे दोघेही अर्जुनवीर काका पवार यांचे शिष्य आहेत. एका वस्तादाचे दोन मल्ल महाराष्ट्र केसरीसाठी लढत असल्याचे प्रथमच घडत आहे.

गेल्या काही वर्षापासून काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात प्रशिक्षण घेतलेले मल्ल अंतिम फेरीत जात होते. पण, ते महाराष्ट्र केसरीची मानाची गदा मिळवू शकले नव्हते. यंदा मात्र कोणीही जिंकले तरी त्याचे श्रेय काका पवार या वस्तादालाच मिळणार आहे. नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने गादी विभागाच्या अंतिम फेरीत माजी विजेत्या पुण्याच्या अभिजित कटके याचा पराभव केला. हर्षवर्धन हा काका पवार यांचा चेला असून पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

माती विभागात सोलापूरच्या माऊली जमदाडे याला लातूरच्या शैलेश शेळके याने आस्मान दाखवत अंतिम फेरी गाठली आहे. याबाबत शेळके याने सांगितले की, महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत गादीवर होणार असल्याने गेल्या सहा महिन्यांपासून गादीवरील कुस्तीचा सराव करत आहे. या दोन्ही चेल्याचे वस्ताद काका पवार यांनी सांगितले की, दोन्ही माझ्याच तालमीत तयार झाले आहेत. दोघांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे. गेली कित्येक वर्षे आमच्या तालमीचे पहिलवान महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीत जात होते. मात्र, विजयाने आजवर आम्हाला हुलकावणी दिली. यंदा मात्र, महाराष्ट्र केसरी आमचाच होणार आहे, यावर आताच शिक्कामोर्तब झाले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/