दोन वर्षाच्या चिमुरडीचा खून करुन मृतदेह लपवला माळ्यावर

मुरबाड : पोलीसनामा ऑनलाईन- शेजारी राहणाऱ्या दोन वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून करुन मृतदेह घरातील माळ्यावर लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाड तालुक्यातील तुळई भागात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका सोळा वर्षाच्या शाळकरी मुलीला शनिवारी (दि.१९) रात्री उशीरा ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे मुरबाड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

मनिष्का जाधव (वय-२ वर्षे) असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. याप्रकरणी निकीता (पूर्ण नाव समजू शकले नाही) या मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धक्कादायक म्हणजे निकिता व मृत चिमुरडी ह्या जवळच्या नातेवाईक आहेत.

मुरबाड तालुक्यातील तुळई या गावातील मनिष्का जाधव ही दोन वर्षीय मुलगी काल दुपारपासून आपल्या घरातून बेपत्ता झाली होती.  शोधाशोध घेऊनही ती न भेटल्याने मुलीचे पालकांनी मुरबाड पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांना प्रकरण संवेदनशील वाटल्याने त्यांनी तत्काळ रात्रीच या गावात जाऊन शोध घेऊन तपास सुरू केला. तेव्हा मनिष्काचा मृतदेह त्यांच्याच शेजारी राहाणाऱ्या निकिता जाधव हिने आपल्याच घराच्या माळ्यावर लपवून ठेवल्याची माहिती दिली.

पोलिसांनी रात्रीच निकीता व तिच्या कुटुंबीयांना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच रविवारी सकाळी पोलिस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे यांनी घटनास्थळी पाहणी करून पोलीसांना अधिक तपासाबाबत सूचना केल्या. या बाबत अधिक तपास सुरू असून या हत्येमागील कारण स्पष्ट झाले नाही.