Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – दगडखाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेले दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बारामती तालुक्यातील पिंपळी येथील डोर्लेवाडी इथं घडली आहे. हे दोघे प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे सायंकाळी पोहण्यासाठी गेले होते. चिमुकल्यांच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे. सम्राट संतोष शिंदे (वय-8) आणि देवा तानाजेव शिंदे (वय-9) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत.

प्रजासत्ताक दिनाची सुट्टी असल्यामुळे सम्राट आणि देवा दोघेजण गावाजवळच असलेल्या दगड खाणीत साठलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. मात्र, खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सायंकाळी साडेचार ते पाच वाजण्याच्या सुमारास आई-वडील मोलमजुरी करुन आल्यानंतर त्यांना आपली मुले दिसली नाही. त्यामुळे त्यांनी मुलांचा शोध सुरु केला.

मुलांचा शोध घेत असताना घरापासून पाचशे मीटर अंतरावर असणाऱ्या दगड खाणीत दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळाव धाव घेऊन मुलांचे मृतदेह बाहेर काढले. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिले.