बारामती : गावठी पिस्तुलासह दोघांना बारामतीत अटक

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – गावठी बनावटीचे पिस्तुल बाळगल्या प्रकरणी बारामती शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या दोन पिस्तुल, दोन जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. राजेंद्र सर्जेराव भंडलकर (वय-24 रा. कोऱ्हाळे बुद्रुक, ता. बारामती) आणि प्रतीक भालचंद्र शिंदे (वय-25 रा. हरीकृपानगर, इंदापूर रोड, बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही कारवाई बारामती – निरा रोडवर करण्यात आली.

उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरामध्ये उपनिरीक्षक योगेश शेलार व गुन्हे प्रकटीकरण शाखेचे कर्मचारी बारामती-निरा रस्त्यावर पेट्रोलिंग करत असताना एका काळ्या रंगाच्या दुचाकीवर (एमएच 12 एफजे 3330) एक युवक संशयितरित्या फिरताना दिसला. पोलिसांनी त्याला हात दाखवून थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहून तो भरधाव वेगात निरा बाजूकडे गेला. त्यामुळे संशय बळावल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग केला.

निरा रस्त्यावरील म्होसोबा मंदिराशेजारी भंडलकर दुचाकी सोडून पळू जात असताना पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावढी बनावटीचे लोखंडी पिस्तुल, त्यात दोन जीवंत काडतुसे मिळून आली. शहरातील कृपानगर भागात राहणाऱ्या प्रतिक शिंदे याच्याकडून हे पिस्तुल घेतल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शिंदेच्या घराची झडती घेतली. तेव्हा घरात एक गावठी बनावटीचे पिस्तुल आढळले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.