टाईप-2 मधुमेह : रूग्णांमध्ये प्रजनन क्षमतेची समस्या उद्भवण्याचा धोका अधिक, 20-40 वयोगटातील तरूणांमध्ये वाढतोय टाईप-2 मधुमेह

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – चुकीची आहारपद्धती आणि बदललेली जीवनशैली यामुळे तरूणांमध्ये टाईप-२ मधुमेही रूग्णांची संख्या वाढतेय. यात २० ते ४० वयोगटातील तरूणांची संख्या सर्वांधिक आहे. शरीरात साखरेची पातळी वाढल्यास मधुमेह हा आजार होतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवले नाही किंवा दुर्लक्ष केले तर विविध आजारांना आमंत्रण मिळतयं. मधुमेहावर नियंत्रण न ठेवण्यास लैंगिक समस्या उद्भवू शकतात. टाईप-२ मधुमेहाने पिडित रूग्णांमध्ये प्रजनन क्षमतेशी संबंधित विकार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे मधुमेह हा आजार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणं गरजेचं आहे.

मधुमेह हा आजार एक ‘साइलेंट किलर’ आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्याच काम इन्सुलिन करते. मात्र पोटातील अन्नाशयात इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. यामुळे मधुमेह होतो. याशिवाय रोजच्या जीवनातील ताणतणाव आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह होऊ शकतो. तसेच अनुवांशिकता व स्थूलता या कारणांमुळेही मधुमेह होतो. वारंवार लघवीला आल्यासारखे वाटणे, तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, प्रचंड भूक लागणे, दृष्टी कमजोर होणे, थकवा जाणवणे, मळमळ, उलटी येणं अशी लक्षणे मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रूग्णांमध्ये दिसून येतात.

पुण्यातील खराडीच्या मदरहुड हॉस्पिटलच्या सल्लागार प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. स्वाती गायकवाड म्हणाल्या, “मधुमेह या आजाराबद्दल लोकांमध्ये अनेक गैरसमजुती आहेत. या आजारासंदर्भात रूग्णाला जागरूक करणं गरजेचं आहे. अनेक तरूण मुली मधुमेहाने पिडित आहेत. मधुमेहामुळे प्रजनन आणि पीसीओडीची समस्या उद्भवू शकते. मधुमेह असलेल्या मुलांच्या बाळांमध्ये जन्म दोष असू शकतात आणि हृदय आणि पचन समस्याही उद्भवू शकते. कावीळ होऊ शकते किंवा अकाली जन्मही होऊ शकतो. अशा प्रकारे या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे काळाची गरज आहे. ”

पुण्यातील अपोलो स्पेक्ट्रा रूग्णालयातील मधुमेह तज्ज्ञ डॉ. संजय नगरकर म्हणाले की, २० ते ४० वयोगटातील प्रौढांमध्ये टाईप २ मधुमेह हा आजार वाढतोय. शरीरात योग्यपद्धतीने इन्सुलिन तयार होत नसल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. हे टाळण्यासाठी आवश्यकतेनुसार शरीरात इन्सुलिन तयार करण गरजेचं आहे. तरच तरूणांमध्ये मधुमेहाचा प्रतिकार होऊ शकतो. परंतु, लठ्ठपणामुळे शरीरातील इन्सुलिन तयार होण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढत राहते. म्हणून मधुमेहाचा उपाय करण्यासाठी रूग्णांनी डॉक्टरांया सल्ल्यानुसार आहारात बदल करणं गरजेचं आहे.

पुण्यातील नोवा आयव्हीएफ फर्टिलिटीच्या कन्सल्टंट फर्टिलिटी डॉ. निशा पानसरे म्हणाल्या की, “मधुमेहामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, मूत्रपिंड, डोळा, पाय आणि मज्जातंतू नुकसान, त्वचेची स्थिती आणि लैंगिक बिघडलेले कार्य देखील होऊ शकते. मधुमेह असलेल्या पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी असते आणि यामुळे सुपीकता, कमी शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते. मधुमेहासाठी नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे.”

मधुमेह हा आजार पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येऊ शकतो, यासाठी आहारात बदल करणं गरजेचं आहे. चपाती, प्रक्रिया केलेले, तळलेले, मसालेदार अन्न, मिठाई आणि मसालेयुक्त पेयांचे सेवन करणं टाळावेत. नियमित व्यायाम, आहारातून मीठ न घेणं, ताजी फळे आणि भाज्या खाव्यात. मधुमेहाचे वेळीच निदान व उपचार करणं आवश्यक आहे, यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.