पुण्यातील सांगवीत खून ‘ऑनर किलिंग’चा प्रकार ? दोघांना अटक, दोन ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – सांगवी येथे प्रेमप्रकरणातून झालेला तरुणाचा खून हा ऑनर किलिंग चा प्रकार असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात सहा जणांवर ऍट्रासिटीसह खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेने दोघांना अटक केली असून दोघांना ताब्यात घेतले आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि. 7) रात्री घडली.

विराज विलास जगताप (18) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा काका जितेश वसंत जगताप (वय 45, रा. जगताप नगर, बुद्ध विहार जवळ, पिंपळे सौदागर) यांनी सोमवारी (दि. 8) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर हेमंत कैलास काटे, सागर जगदीश काटे, रोहित जगदीश काटे, कैलास मुरलीधर काटे, जगदीश मुरलीधर काटे, हर्षद कैलास काटे (सर्व रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील दोघांना अटक केली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विराज याचे आरोपीच्या नातेवाईक तरुणीशी प्रेमसंबंध होते. या कारणावरून आरोपींनी आपसांत संगनमत करून रविवारी (दि. 7) रात्री दहा वाजताच्या सुमारास पिंपळे सौदागर येथे त्याच्या दुचाकीला टेम्पोने पाठीमागून धडक दिली. तो जिव वाचविण्यासाठी पळून जाऊ लागला. त्यावेळी हेमंत काटे याने लोखंडी रॉड विराजच्या डोक्‍यात मारहाण करुन खून केला. तपास सांगवी पोलीस करत आहेत.