ठरलंच ! UAE मध्ये होणार IPL 2020, गव्हर्निंग कौन्सिलच्या अध्यक्षांनी केली पुष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया चषक आणि टी -20 विश्वचषक स्पर्धा झाल्यामुळे आता आयपीएल 2020 चा मार्ग देखील सुकर झालेला आहे. पण आता ही स्पर्धा भारतात होईल की मग भारताबाहेर होईल याकडे सर्वांचेच लक्ष होते. अखेर याबद्दल आयपीएलच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष बृजेश पटेल यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली असून त्यांनी मुलाखतीत सांगितले की, आयपीएल 2020 युएईमध्ये आयोजित करण्यात येईल. तथापि, ते म्हणाले की या स्पर्धेची तारीख अद्याप ठरलेली नाही. बृजेश पटेल यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माहिती दिली की आयपीएल 2020 चे आयोजन युएईमध्ये होईल. मात्र, अद्याप स्पर्धेच्या तारखांचा निर्णय झालेला नाही असे ते म्हणाले. पुढील आठवड्यात आयपीएलची गव्हर्निंग कौन्सिलची बैठक होणार असून या स्पर्धेच्या तारखा व आराखड्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पटेल यांनी सांगितले.

पटेल म्हणाले की आयपीएल 2020 चे वेळापत्रक भारत सरकारने परवानगी दिल्यानंतर तयार केले जाईल. 28 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत आयपीएल होणार असल्याची बरीच चर्चा सुरु आहे. मात्र पटेल यांनी याबाबतचे वृत्त नाकारले आहे. ते म्हणाले की गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीनंतर वेळापत्रक निश्चित केले जाईल. आयपीएलचे आयोजन करण्याचा प्रस्ताव युएईने दिला होता. त्यांना लवकरच या स्पर्धेची तारीख व संपूर्ण वेळापत्रक दिले जाईल, असे पटेल यांनी मुलाखतीदरम्यान सांगितले.

युएईने सुरु केली आयपीएलची तयारी
सध्या युएईने आयपीएलची तयारी सुरू केलेली दिसत आहे. दुबई स्पोर्ट्स सिटीचे क्रिकेट स्पर्धेचे प्रमुख सलमान हनीफ म्हणाले होते की आयपीएल डोळ्यासमोर ठेवून सुविधा तयार करण्यात आल्या आहेत. हनिफ यांनी गल्फ न्यूजला सांगितले होते की दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम क्रिकेट सामन्यांसाठी सज्ज आहे. हनिफ यांनी म्हटले होते की दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये नऊ खेळपट्ट्या आहेत त्यामुळे क्रिकेट सामन्यांसाठी खेळपट्ट्या तयार करण्यास वेळ लागणार नाही.