59 चायनीज अ‍ॅपवरील बंदीनंतर आता ‘या’ चीनी कंपनीनं भारतातील गाशा गुंडाळला, 90 % कर्मचारी बेरोजगार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनची इंटरनेट कंपनी अलिबाबा ग्रुपची सहाय्यक कंपनी यूसी वेबने आपला संपूर्ण व्यवसाय भारतात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरात कंपनीचे जवळपास 350 कर्मचारी होते, त्यापैकी जवळपास 90 टक्के लोकांना कामावरुन काढून टाकले गेले आहे. कंपनीच्या असोसिएट, मॅनेजर आणि एंट्री लेव्हलच्या कर्मचार्‍यांना फोनवरून तसेच व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे काढून टाकत असल्याची माहिती दिली. या प्रकरणाची माहिती असलेल्या एका सूत्रांनी सांगितले की, कंपनीने सर्व कर्मचार्‍यांना एक महिन्याची नोटीस दिली आहे. 29 जून रोजी भारत सरकारने 59 चिनी अ‍ॅप्स बंद करण्याचा निर्णय घेतला. यात टिक-टॉक, हॅलो, यूसी वेब, यूसी न्यूजसह 59 अ‍ॅप्सचा समावेश आहे. 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये चीनशी झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारत सरकारने हे पाऊल उचलले. या चकमकीत भारताच्या कर्नलसह 20 सैनिक शहीद झाले होते.

Vmate कर्मचार्‍यांनाही काढण्यात आले
यूसी वेबच्या प्रवक्त्याने गुरुवारी सांगितले की, सरकारच्या अलीकडील निर्देशांमुळे त्यांना आपला व्यवसाय गुंडाळावा लागला. या व्यतिरिक्त कंपनीने काहीही बोलण्यास नकार दिला. यूसी वेब हे 2009 पासून भारतात व्यवसाय करत होते. यात मोबाइल ब्राउझर आणि यूसी न्यूज नावाच्या अ‍ॅग्रिगेटरची सेवा देखील होती. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, अलिबाबाच्या व्हिडिओ ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरील Vmateच्या कर्मचार्‍यांनाही काढून टाकण्यात आले आहे.

यूसी वेब इंडियाची दुसरी सर्वात मोठी मोबाइल ब्राउझर कंपनी
यूसी वेबचे जगभरात 43 कोटींपेक्षा जास्त सक्रिय वापरकर्ते आहेत. यापैकी 13 कोटी एकट्या भारतात होते. जून 2020 पर्यंत, यूसी वेब गूगल क्रोम नंतर 10 टक्के हिस्सा असलेल्या भारतातील दुसर्‍या क्रमांकाची मोबाइल ब्राउझर कंपनी होती.