पदवी प्रमाणपत्रावर ‘Covid-19’ चा उल्लेख असणार का ? उदय सामंतांचा महत्त्वाचा खुलासा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळं पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या अभूतपूर्व गोंधळामुळं विद्यार्थी अजूनही संभ्रमात आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे की, पदवीच्या परीक्षा होणार आहेत आणि विद्यार्थ्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही. पूर्वीप्रमाणेच विद्यार्थ्यांना पदवीचं प्रमाणपत्र मिळणार आहे. कसलाही संभ्रम निर्माण करून घेऊ नये असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

इतकंच नाही तर पदवी प्रमाणपत्रात कोविड 19 च्या उल्लेखाबद्दल जो कुणी चुकीचा संदेश देईल त्यावर पोलीस कारवाई करणार असल्याचा इशाराही उदय सामंत यांनी दिला आहे. उदय सामंत यांनी सांगितलं की, 50 मार्कांची परीक्षा होईल. 90 टक्के विद्यार्थी हे ऑनलाईन परीक्षा देणार आहेत. मागील वर्षांचे मार्क्स गृहीत धरण्यात येणार आहेत. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची डिसेंबरमध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा फॉर्मसाठी 3 दिवस मुदतवाढ
मुंबई विद्यापीठात 1 लाख 77 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. काही मुलांचे फॉर्म भरायचे राहिले आहेत. त्यांना 3 दिवस मुदतवाढ देण्यात आली आहे. परंतु त्यानंतर मात्र त्यांना फॉर्म भरता येणार नाही.

‘प्रमाणपत्रावर कोविड-19 च्या संदर्भानं काहीही उल्लेख नसेल’
उदय सामंत म्हणाले, “पदवीच्या प्रमाणपत्रावर कोविड-19 च्या संदर्भानं काहीही उल्लेख नसेल. गतवर्षी प्रमाणेच या वर्षीही पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यात काहीही बदल असणार नाही.

दरम्यान उदय सामंत हे सध्या राज्यातील विद्यापीठांचा दौरा करत आहेत. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसदर्भात उदय सामंत कुलगुरूंच्या आढावा बैठका घेत आहेत.