Satara News : उदयनराजेंनी केलं शिवेंद्रराजेंचं कौतुक, म्हणाले – ‘आमचे खास बंधू…’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन

मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले आज एकाच व्यासपीठावर आले होते. यावेळी मराठा समाजाला दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नाही, असे उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले.
साताऱ्यात आण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या स्थापना कार्यक्रमात छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी दोन्ही राजे एकाच व्यासपीठावर पाहण्यास मिळाले. दोन्ही राजेंनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आपली रोखठोक भूमिका मांडली.
या कार्यक्रमात बोलताना उदयनराजे भोसले यांनी, या कार्यक्रमाला आमचे खास बंधू असे म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. मराठा मोर्चा आतापर्यंत अत्यंत शांतपणे निघाले आहेत. प्रत्येक मतदार संघात मराठा समाजाला वेगळी वागणूक देणे हे योग्य नाही. आम्हाला दुसऱ्याचं आरक्षण काढून आम्हाला द्या अशी आमची मागणी नसल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
दुसऱ्यांचा लाभ काढून आम्हाला देऊ नका. सर्वांना न्याय दिला, मग आम्हाला का नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मला नेत्यांना एकच सांगायचयं, लोकांचा अंत पाहू नका, एकदा जर उद्रेक झाला तर त्याला कोण थांबवणार ? हा उद्रेक एक ना एक दिवस नक्की होईल, असं उदयनराजे म्हणाले.

शिवेंद्रराजे यांनी आपल्या भाषणातून मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. मुद्दामहून मराठा आरक्षणाला खोडा घालण्याचे काम राज्यात होत आहे. कोपर्डी सारखी घटना पुन्हा व्हायची वाट पहाणार का ? असा संतप्त सवाल शिवेंद्रराजे यांनी उपस्थित केला. खासदार उदयनराजे आणि संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली हा लढा दिला पाहिजे. कोणीही टीका केल्या तरी मराठा समाजाने लक्षात घेतलं पाहिजे की देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिलं आहे, असे देखील शिवेंद्रराजे म्हणाले.