‘जाणता राजा’ फक्त छत्रपती शिवाजी महाराजच, उदयनराजेंचा शरद पवारांना अप्रत्यक्ष ‘टोला’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – ‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर देशात आणि महाराष्ट्रातून निषेध करण्यात येत आहे. या पुस्तकावरून अनेकांनी आपापली मते मांडली. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांचे 13 वे वंशज उदयनराजे भोसले काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. मागील साडेतीनशे वर्षापासून महाराष्ट्राच्या अस्मितेचा सर्वोच्च अभिमानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करण्यात आली. यावर उदयनराजे भोसले यांनी संताप व्यक्त करत महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. महाराजांशी तुलना करणं अत्यंत चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

संजय राऊत यांनी शिवरायांचे वंशज असणाऱ्या कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीच्या वारसदारांनी स्पष्ट भूमिका जाहीर करावी आणि भाजपातून राजीनामे देण्याची मागणी केली होती. यावर बोलताना उदयनराजे भोसले यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर ताशेरे ओढले. छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का ? असा प्रश्न अनेकदा पडतो असे सांगताना जे पुस्तक प्रकाशित झाले ते ऐकून अत्यंत वाईट वाटले. नरेंद्र मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना करणं अत्यंत चुकीचे आहे. महाराजांसोबत तुलना होईल इतकी जगात कोणाचीही उंची नाही. तसेच जाणता राजा फक्त छत्रपती शिवाजी महाराजचं, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

‘आज के शिवाजी, नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महाराष्ट्रात वादंग उठला होता. हे पुस्तक माघारी घ्यावे अशी मागणी विरोधकांनी केली होती. अखेर या पुस्तकावरून सुरू झालेल्या वादावर भाजपने पडदा टाकला आहे. प्रकाशित झालेल्या पुस्तकाचा भाजपशी काहीही संबंध नाही. लेखकाने क्षमा मागितली असून पुस्तकही मागे घेण्यात आले आहे. हा वाद आता संपला आहे, असे ट्विट करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

फेसबुक पेज लाईक करा –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like