खा. उदयनराजे शरद पवारांच्या भेटीला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपामध्ये जाणार अशी सातत्याने चर्चा असलेले खासदार उदयनराजे भोसले हे आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला जात आहे. पुण्यातील मोदी बाग येथे गुरुवारी सकाळी १० वाजता ही भेट होणार आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे हे उपस्थित असणार आहे.

उदयनराजे हे कधीही कोणत्याही पक्षाच्या चौकटीत न राहणारे आहेत. त्यांनी साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांविरोधात अनेकदा भुमिका घेतली. असे असतानाही नाईलाज म्हणून शरद पवार यांनी त्यांना पाठीशी घातले. साताऱ्यातील राजकारणातील राष्ट्रवादीमधील वादावादीमुळे शिवेंद्रराजे भोसले हे भाजपावासी झाले. त्यानंतर आता तेथेही उदयनराजे येणार असल्याने त्यांच्यासह समर्थक तसेच भाजपाचे नेते, कार्यकर्ते अस्वस्थ झाले. तसेच ते पक्षाची चौकट न मानणारे आहेत, हा मेसेज दिल्लीत पोहचविला गेला. त्यातूनच त्यांना असलेला विरोध भाजपाच्या वरिष्ठांवर पोहचविला गेला. त्यामुळे त्यांचा भाजपा प्रवेश लांबणीवर पडला.

दुसरीकडे गेल्या आठवड्यात पुण्यात झालेल्या बैठकीत त्यांच्या समर्थकांनी भाजपात न जाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कोणता निर्णय घ्यावा, या विषयी उदयनराजे यांना नेमका निर्णय घेता आला नाही. त्यातूनच आता ते शरद पवार यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. उदयनराजे यांनी भाजपा प्रवेशाचा बेत बदलला असण्याची शक्यता त्यातून दिसून येते.

आरोग्यविषयक वृत्त –