लोकसभेत उदयनराजे सगळ्यात शेवटी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या आक्रमक शैलीमुळे, तसेच विशिष्ट डायलॉगबाजीमुळे सतत चर्चेत राहणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आज मात्र वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आले आहेत. लोकसभेच्या प्रगतिपुस्तकात उदयनराजे चक्क फेल झालेले आहेत. लोकसभेत त्यांचा नंबर शेवटून पहिला आला आहे. सातारा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे फक्त २७ टक्के दिवसच लोकसभेत हजर होते. त्यांनी एकाही चर्चेत भाग घेतला नाही आणि प्रश्नही विचारला नाही, त्यामुळे ते खालून पहिले आले आहेत.

नुकतीच १६ व्या लोकसभेचं शेवटचं अधिवेशन पार पडलं. या अधिवेशनाबद्दल एका वृत्तवाहिनीने खासदारांच्या उपस्थिती , चर्चा सहभाग यावरून खासदारांचं प्रगतिपुस्तक तयार केलं आहे. यात उदयन राजे शेवटून पहिले ,अशोक चव्हाण शेवटून दुसरे तर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी पहिला क्रमांक मिळवला आहे.

खासदारांचे प्रगतीपुस्तक उतरत्या क्रमाने –

नांदेडचे खासदार अशोक चव्हाण यांनी उदयन राजेंनंतर दुसरा क्रमांक मिळवला आहे. नऊ वेळा चर्चेत सहभागी होत त्यांनी ८९८ प्रश्न विचारले आहेत.
त्यानंतर बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी फक्त ५४ टक्के हजेरीसह तिसरा क्रमांक मिळवला आहे. ४४९ प्रश्न आणि ३२ चर्चांमध्ये त्या सहभागी झाल्या.
खालून चौथ्या क्रमांकावर असलेले परभणीचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी ५५ टक्के दिवस हजर राहत २८० प्रश्न विचारतानाच २१ चर्चांमध्ये भाग घेतला.
पाचवा क्रमांकावर असलेल्या सांगलीच्या भाजप खासदार संजयकाका पाटलांनी ५६ टक्के दिवस हजेरी लावत मिळवला आहे.

खासदारांचे प्रगतीपुस्तक चढत्या क्रमाने – (Topper )

दक्षिण मुंबईचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी ९८ टक्के दिवस लोकसभेत उपस्थित राहत पहिला क्रमांक पटकावला आहे. त्यांनी ४७८ प्रश्न विचारतानाच २८६ वेळा चर्चेतही सहभाग घेतला. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईकर किरीट सोमय्याच आहेत. ईशान्य मुंबईतील खासदार सोमय्यांनी ९७ टक्के हजेरी १२० वेळा चर्चेत भाग घेतला. तिसऱ्या क्रमांकावर बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आहेत. तब्बल ११७६ प्रश्न विचारण्याचा विक्रम केला आहे. १४९ वेळा चर्चेत सहभागी झालेल्या सुप्रिया सुळेंनी २२ खाजगी विधेयकेही सादर केली. ९६ टक्के दिवस त्या सभागृहात होत्या.
लातूरच्या सुनील गायकवडांनी सुप्रिया सुळेंनीतकीच हजेरी लावली आहे. मात्र त्यांनी ६८१ प्रश्न विचारत ४२ वेळा चर्चेत सहभाग घेतला.