उदयनराजे आणि सुप्रिया सुळे सर्वात ‘श्रीमंत’ खासदार ; जाणून घ्या किती आहे संपत्ती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपने बाजी मारली तरी सर्वाधिक श्रीमंत खासदारांच्या यादीत राष्ट्रवादीच अग्रेसर आहे. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादीच्या बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे हे राज्यातील सर्वात श्रीमंत खासदार ठरले आहेत. ‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या संस्थेने राज्यातील ४८ खासदारांची आर्थिक परिस्थिती आणि त्यांच्या विरोधात दाखल असलेले गुन्हे यांची सविस्तर माहिती प्रसिद्ध केली आहे. त्यात हे दोघे सर्वात श्रीमंत खासदार आहेत. तर १५ नवनिर्वाचित खासदारांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

संस्थेने दिलेल्या माहितीनुसार ४८ पैकी २५ खासदारांनी त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल असल्याची माहिती उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केली आहे. त्यातीलही १५ खासदारांच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, धमकावणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हे असलेल्या खासदारांच्या संख्येबाबतीत भाजप वरचढ ठरले आहे. राज्यात भाजपचे २३ खासदार आहेत. त्यातील ६ खासदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तर शिवसेनेचे एकूण १८ खासदार आहेत त्यातील ५ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि एमआयएम पक्षाचे प्रत्येकी एकेक खासदारावर गुन्हा दाखल आहे.

राज्यातील श्रीमंत खासदारांची यादी

उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी काँग्रेस) – १९९ कोटी

सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) – १४० कोटी

रणजितसिंह नाईक निंबाळकर (भाजप) – १२७ कोटी

श्रीरंग बारणे (शिवसेना) – १०२ कोटी

सुनील मेंढे (भाजप) – ६२ कोटी

कपिल पाटील (भाजप) – ४१ कोटी

नितीन गडकरी (भाजप) – १८ कोटी

सुनील तटकरे (राष्ट्रवादी) – १२ कोटी