राज्यसभेसाठी उदयनराजे भोसले आणि रामदास आठवलेंच्या नावावर ‘शिक्कामोर्तब’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शुक्रवारी रात्री उशिरा गृहमंत्री अमित शहा यांच्या निवास्थानी एक बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्रातून राज्यसभेत उदयनराजे भोसले यांचे नाव निश्चित करण्यात आल्याचे समजते तसेच रामदास आठवले यांच्या उमेदवारीबाबत देखील निश्चिती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उदयनराजे भोसले हे साताऱ्याचे माजी खासदार आहेत तर आठवले यांनी आधीही मोदी मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री म्हणून काम पाहिलेले आहे.

राज्यसभा निवडणुकीसह राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारांच्या नावावरही बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीसाठी शहांच्या निवासस्थानी महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.

राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भाजप नेत्यांनी दुपारी भेट घेतली होती यावेळी राज्यसभेच्या जागांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आली होती. राज्यसभेच्या 7 जागा 2 एप्रिल 2020 ला रिक्त होत आहेत. फेब्रुवारी अखेरपर्यंत त्यासाठीची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे.

राज्यसभेतून हे सात सदस्य होताहेत निवृत्त
येत्या एप्रिल महिन्यापर्यंत राज्यसभेच्या सात जागा रिक्त होताहेत त्या अनुषंगाने भाजपने तयारी सुरु केल्याचे समजते. या रिक्त होणाऱ्या जागांमध्ये राष्ट्रवादीचे शरद पवार, माजिद मेमन, काँग्रेसचे हुसेन दलवाई, शिवसेनेचे राजकुमार धूत, भाजपचे रामदास आठवले, अमर साबळे, संजय काकडे यांचा समावेश आहे. यामधील शरद पवार आणि रामदास आठवले हे दोनीही नेते राज्यसभेवर पुन्हा जाणार हे जवळपास निश्चित आहे.

कसे आहे राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे राज्यसभेतील संख्याबळ
महाराष्ट्रातून एकूण 19 खासदार राज्यसभेवर जातात. दर दोन वर्षांनी 7, 6 आणि 6 अशा जागा रिक्त होतात. सहा वर्षांपूर्वी जेव्हा 7 जागांसाठी निवड झाली होती तेव्हा ती बिनविरोध झाली होती. आता याहीवेळी ही निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाविकास आघाडीच्या सध्याच्या संख्याबळानुसार त्यांचे 7 पैकी 4 खासदार निवडून येऊ शकतात.
राष्ट्रवादीला दोन खासदार, शिवसेनेला एक, काँग्रेसला एक अशी विभागणी त्यामुळे होवू शकते.
शिवसेनेच्या मदतीची भरपाई पुढच्या वेळी त्यांना अधिक सीट देऊन केली जाऊ शकते अशी चर्चा आहे.

You might also like