खा. उदयनराजेंनी केले PM मोदींचे अभिनंदन

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिका-भारत रणनीतीक भागीदारी वाढवण्याकरता केलेल्या नेतृत्वासाठी मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लीजन ऑफ मेरिट (Legion of Merit) या पुरस्काराने अलीकडेच सन्मानित केले होते. त्याच पार्श्वभूमीवर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ट्विटरवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले, “भारत-अमेरिका संबंध समृद्ध करण्याच्या उत्कृष्ट प्रयत्नांसाठी अमेरिकेच्या अध्यक्षांनी ‘लीजन ऑफ मेरिट’ देऊन सन्मानित केल्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन.”

हा पुरस्कार अमेरिकेतील भारताचे राजदूत तरनजीत सिंह संधू यांनी व्हाईट हाऊस येथे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांच्याकडून पंतप्रधान मोदी यांच्या वतीने स्वीकारला होता.

दरम्यान, याबाबत बोलताना सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटलं की, अमेरिका-भारत रणनीतीक भागीदारी वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारासाठी तसेच नेतृत्त्वासाठी त्यांना राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सन्मानित केले आहे. त्यांच्या दृढ नेतृत्व आणि दूरदृष्टीमुळे हा पुरस्कार देण्यात आला आहे. मोदींनी जागतिक शक्तीच्या रूपात भारताला गती दिली आणि जागतिक आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी अमेरिका आणि भारताच्या दरम्यान रणनीतीक भागीदारी वाढवली आहे.