भाजपाने देशातल्या राजांनाही भीक मागायला लावली : खा. उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपा सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली. पाच वर्षात त्यांच्या हातात वाडगं दिले. अशी टीका खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

देशात दोन टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. येत्या २३ एप्रिलला तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. ज्यामध्ये महाराष्ट्रातील १४ मतदार संघांचा समावेश आहे. सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपा -शिवसेना सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्यावेळी, तुम्ही निधी दिला परंतू मी त्याचा पाठपुरावा केला म्हणून तुम्ही कामे केली.

या सरकारने देशातल्या राजांना भिक मागायला लावली, त्यांच्या हातात पाच वर्षात वाडगं दिले. गरिबांचे उदरनिर्वाहाचे साधनसुद्धा हिरावून घेतले. तसेच निवडणुका लागल्या की यांच्याकडे भरभरुन पैसे असतात. आमच्या गाड्या चेक केल्या तर शिळ्या भाकरी मिळतील. परंतू तुम्हाला ज्या गाडीवर कमळ दिसेल त्या गाडीत मी तुम्हाला पैसे शोधुन देतो. असे खासदार उदयनराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उत्तर देतांना म्हंटले.

इतकेच नव्हे तर, मुक मोर्चाला ‘मूका मोर्चा’ म्हणणाऱ्यांनी जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगावी. ही तुमची संस्कृती आहे का? असा सवालही त्यांनी केला. याचबरोबर लोकांसमोर जाताना आती ही लोकं लटलट कापतायत. भाषण करताना डायसचा आधार नसेल तर ते खाली पडतील. असा टोलाही त्यांनी साताऱ्याचे शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांना लगावला.