लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा; खा. उदयनराजे आक्रमक (व्हिडीओ)

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन –  सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर भाजप खासदार उदयनराजे भोसले आक्रमक झाले आहेत. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल जरी असला तरी राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत आपली जबाबदारी स्वीकारली पाहिजे. वेगवेगळ्या पक्षातील ज्येष्ठ लोकांनी आतापर्यंत आपली भूमिका का स्पष्ट मांडली नाही, असा सवाल उपस्थित करुन त्यांनी नाव न घेता शरद पवार यांना टोला लगावला. मराठा समाजाने यापुढे आंदोलन करु नये असं सांगत निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना रस्त्यात आडवा आणि घरातून बाहेर फिरू देऊ नका, असे आवाहन मराठा समाजाला त्यांनी केले. खासदार उदयनराजे यांच्या आवाहनानंतर आगामी काळात मराठा आरक्षणाचा विषय आणखीनच तापण्याची शक्यता आहे.

बुधवारी मराठा आरक्षण रद्द केल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. मुंबई उच्च न्यायालयाने हे आरक्षण वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालायच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने रद्द ठरवला. राज्यातील मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास नसल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालायने नोंदवलं आहे. न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालील पाच न्यायमूर्तींनी हा निर्णय दिला. या निर्णयानंतर राजकीय प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात येत आहेत. आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.

कोणत्याही पक्षाचे का असेना त्या आमदार आणि खासदारांना रस्त्यात आडवा, जाब विचारा, मराठा आरक्षणाचं काय झाले हे विचारा, असे सांगताना जरी सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं असलं तरी राज्य सरकारची काही जबाबदारी नाही का ? राज्य सरकार जबाबदारीतून हात झटकू शकत नाही, असा इशारा उदयनाराजे भोसले यांनी दिला.