शिवेंद्रराजे आणि माझ्यात ‘राष्ट्रवादी’च्या एकाने ‘भांडणं’ लावली, उदयनराजेंचा ‘गौप्यस्फोट’

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहावर शिवेंद्रराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर बोलताना उदयनराजे भोसले यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. माझ्यात आणि शिवेंद्रराजे यांच्यामध्ये कधी वाद नव्हताच. आमच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधील व्यक्ती भांडण लावत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे खळबळ उडाली असून त्यांच्यात भांडण लावणारा व्यक्ती कोण ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

एका न्यूज चॅनलशी बोलताना उदयनराजे भोसले यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पुढे बोलताना उदयनराजे म्हणाले, आमच्यात कधी वाद नव्हतेच. तसेच आमच्यात यापुढे देखील वाद नसणार असे त्यांनी सांगितले. तर आमच्यामध्ये औपचारीक बैठक झाल्याची प्रतिक्रीया शिवेंद्राजे यांनी दिली आहे. उदयनराजे यांच्या राजीनाम्यामुळे आता पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणूकीमध्ये आपण निवडून येणार असल्याचा विश्वास उदयनराजे यांनी बोलून दाखवला आहे.

भाजपमध्ये प्रवेश करताना मी कोणतीही मागणी केली नाही. 15 वर्ष राष्ट्रवादीने माझी अडचण केली. त्यात एवढ्या वर्षात एकही काम झालेले नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. राष्ट्रवादीवर टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्यावरही आरोप केले. भाजपमध्ये जाण्याआधी मी खूप विचार केला. शरद पवार यांच्याविषयी मला खूप आदर आहे. पण त्यांना अनेकवेळा सांगूनही कामे झाली नाहीत, त्यामुळेच मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.