राष्ट्रवादी सोडण्याआधी उदयनराजे झाले भावुक, दिली ‘ही’ प्रतिक्रिया

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बऱ्याच दिवसांपासून साताऱ्याचे खा. उदयनराजे भोसले भाजपात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा होती. मात्र आता स्वतः उदयनराजेंनीच याबाबत खुलासा केला आहे. उदयनराजे 14 सप्टेंबर रोजी पंतप्रधानांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत.

उदयनराजे आपल्या खासदारकीचा राजीनामा देणार आहेत. त्यासाठी उदयनराजे संध्याकाळी दिल्लीत दाखल होतील आणि तेथेच भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांसोबत पक्षात प्रवेश करणार आहेत. याची घोषणा उदयनराजेंनी आपल्या ट्विटरवरून ट्विट करून केली आहे.

उदयनराजेंनी काहीसे भावनिक ट्विट करत म्हटलं आहे की, ‘आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाच्या व आशीर्वादाच्या जोरावर समाजकार्य करण्याची प्रेरणा मिळत राहिली. अपेक्षा आहे की आपले हेच प्रेम व आशीर्वाद अविरत माझ्या पाठीशी राहील,’ त्याचप्रमाणे भाजपमध्ये उद्या प्रवेश करणार असल्याचे सांगत भाजप नेत्यांसोबत एक फ्लेक्स स्टाईल फोटो ही ट्विट केला आहे.

निर्णय जाहीर करण्याच्या आधी उदयनराजेंनी शरद पवारांची भेट घेतली होती. मात्र त्या भेटीचा काही फायदा झाल्याचे दिसत नाही. उदयनराजेंनी भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. तसेच उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर येत्या विधानसभेसोबत लोकसभेची पोट निवडणूक घ्यावी अशी मागणी केली होती त्यामुळे त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता. मात्र शेवटी आता उदयनराजे हे घड्याळ काढून कमळ हाती घेणार असल्याचे निश्चित झाले आहे.