‘देवा शप्पथ सांगतो… माझा मित्र असं करणार नाही’ ; मुख्यमंत्र्यांबाबत उदयनराजेंचा दावा

नक्की काय घडला किस्सा ?

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. राज्यात आज १४ मतदारसंघामध्ये मतदान होत आहे. सातारा लोकसभा मतदार संघाचा देखील यात समावेश आहे. आज सकाळी राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षाचे असले तरी ते चांगले मित्र असल्याचे उदयनराजे यांनी अनेकदा संगितले आहे. यावेळी एका वृत्तवाहिनीशी बोलताना उदयनराजे यांनी आपल्या अनोख्या अंदाजात पुन्हा एकदा त्यांच्या मैत्रीबाबत दावा केला.

नक्की काय आहे किस्सा ?

त्याचे झाले असे की, मतदान करून आल्यानंतर उदयनराजेंना मुख्यमंत्र्यांनी या मतदार संघात तुमच्याविरुद्ध मोठी ताकद लावली होती. तुमच्याविरुद्ध त्याला तुमचं मताधिक्य उत्तर देईल का ? असा प्रश्न पत्रकाराने विचारल्यावर उत्तर देताना उदयनराजे म्हणाले, ” अहो तसे नाही… ते माझे चांगले मित्र आहेत. ते इथं दक्षता घ्यायला आले होते. इथे उदयनराजेंचे मतदान व्यवस्थित होणार ना ? तशा सूचना देखील त्यांनी सगळ्यांना दिल्यात. असा खोचक टोला यावेळी उदयनराजेंनी मिश्कीलपणे लगावला.

पुढे बोलताना ते म्हणाले, ” मला माहित आहे, माझा मित्र काय आहे. देवा शप्पथ सांगतो माझा मित्र असा करणार नाही” असा दावा उदयनराजेंनी यावेळी केला.

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीकडून उदयनराजे भोसले तर भाजप-शिवसेना युतीकडून नरेंद्र पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान आज तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.