‘या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं’, उदयनराजेंचा शरद पवारांवर ‘निशाणा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ईडीच्या कारवाई विरोधात काँग्रेस, शिवसेना, अण्णा हजारे आणि राजू शेट्टी यांनी पवारांना पाठिंबा दर्शविला आहे. मात्र असे असताना उदयनराजेंनी मात्र शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कर्जवाटप घोटाळ्याच्या प्रकरणात ईडीनं शरद पवारांसह 70 नेत्यांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले होते. बँकेशी काहीही संबंध नसताना गुन्हा दाखल झाल्यानं पवार यांनी स्वत: ईडीच्या कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला होता. याविषयी एका एका वृत्त वाहिनीला प्रतिक्रिया देताना उदयनराजे म्हणाले आहेत की, या जन्मातलं याच जन्मी फेडावं लागतं, दुसरं काय?

पवार जर साताऱ्यातल्या पोटनिवडणुकीत उभे राहिले तर मी निवडणूक लढणार नाहीत असे दोनच दिवसांपूर्वी उदयनराजे म्हणाले होते. तसेच त्यांच्याविषयी बोलतानाही भावुक झाले होते. त्यांच्या या प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

जे कराल ते भरावंच लागेल
भाजपा सरकार हे सूडबुद्धीने ईडीची कारवाई करतेय असा कांगावा साफ खोटा आहे. जे कराल ते भरावंच लागेल, असे विधान करत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शरद पवारांवर काल टीका केली होती.