‘उदयनराजेंनी माझ्या २३ प्रश्नांची उत्तरे शुद्धीत असताना द्यावीत’ : नरेंद्र पाटील

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – लोकांनी निवडून दिलेल्या खासदाराने लोकांची प्रश्न सोडवायचे असतात, ते विद्यमान खासदार उदयनराजेंनी सोडवले नाहीत. सातारा जिल्ह्याचा खुंटलेला औद्योगिक विकास, बेरोजगारी या प्रश्नांबाबत खासदार बोलायला तयार नाही. मी त्यांना २३ प्रश्न विचारतोय, त्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शुद्धीत असताना द्यावीत, अशी जहरी टीका शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.

उदयनराजेंनी दहा वर्षे खासदार म्हणून काम केले. त्यांनी या काळात किती प्रश्न संसदेत विचारले ? त्यांची संसदेतील हजेरी किती काळ होती ? जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्याकरिता त्यांनी किती तास चर्चेत सहभाग घेतला ? जीएसटी आणि नोटबंदीच्या विषयांवर ते टीका करत आहेत मग या निर्णयामुळे देशातील जनतेचे काय नुकसान झाले, याबाबत त्यांनी संसदेत मत मांडले का ? खासदार निधीचा वापर नेमका कोणत्या तालुक्यात आणि किती केला ? दोन निवडणुका त्यांनी यापूर्वी जिंकल्या होत्या. त्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यातील किती गोष्टींची त्यांनी वचनपूर्ती केली ? छत्रपती शिवाजी महाराजांचे ते थेट तेरावे वंशज असल्याचे सांगतात, मग प्रतापगडाची दुरावस्था दूर करण्यासाठी त्यांनी कोणती पावले उचलली ? साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांचे वस्तुसंग्रहालय धूळखात पडले आहे, त्याबाबत त्यांनी का पुढाकार घेतला नाही ? इत्यादी प्रश्न नरेंद्र पाटील यांनी उपस्थित केले आहेत. या प्रश्नांची उत्तरे उदयनराजे यांनी शुद्धीत असताना द्यावीत असे त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे.

उदयनराजे हे दहा वर्षे खासदार होते. मात्र त्यांचे कार्यालयही साताऱ्यात नाही. लोकांना प्रश्न घेऊन जायचे असेल तर त्यांच्या राजवाड्याबाहेर जाऊन थांबावे लागते. त्यातही ते भेटतील की नाही याची खात्री नाही. सातारा जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांचे प्रश्न त्यांनी का सोडवले नाहीत, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

Loading...
You might also like