बाळासाहेबांची अंबाबाईवर श्रद्धा म्हणून युतीच्या प्रचाराचा नारळ अंबाबाईच्या दर्शनाने फुटणार

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने उद्या शिवसेना-भाजप युतीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईच्या दर्शनाने फोडणार आहेत.

सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची अंबाबाईवर श्रद्धा होती. बाळासाहेब ठाकरेही नेहमी प्रचाराची सुरुवात कोल्हापुरातून करायचे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कोल्हापुरात आंबाबाईचे दर्शन घेऊन फोडणार आहेत. तसेच, कोल्हापुरातील तपोवन या मैदानावर युतीच्या सभेचे नियोजन करण्यात आले आहे.

युतीच्या सभेसाठी जोरदार नियोजन करण्यात आले असून सभेच्या दिवशी राज्यभरातून कार्यकर्ते येणार आहेत. गर्दीच्या कारणाने जर कार्यकर्त्यांना सभेपर्यंत पोहचता आले नाही तर त्यांच्यासाठी शहरातील प्रमुख चौकात १० स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत.

इतकेच नव्हे तर, कोल्हापुरातील ही सभा ‘न भूतो न भविष्यति’ करून दाखवणार आहे. तसेच, कोल्हापुरातील शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून आणण्याचा संकल्पही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, २८ मार्चला वर्धा लोकसभा मतदार संघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील पहिली सभा होणार आहे.