विधानसभा 2019 : आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ ठरला ? ‘या’ मतदारसंघातून लढवणार निवडणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी केली असली तरी अद्याप शिवसेना-भाजप युतीचे घोंगड भीजत आहे. युतीची घोषणा झाली नसताना शिवसेनेने आपल्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील इच्छूक उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे. शिवसेनेच्या 25 संभाव्य उमेदवारांची यादी लीक झाली असून या यादीमध्ये युवा सेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

लीक झालेल्या शिवसेनेच्या यादीमध्ये शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी, भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव, माहिममधून सदा सरवणकर, वांद्रे पूर्व मधून विश्वनाथ महाडेश्वर यांची नावे आहेत. आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून ते 3 ऑक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून आदित्य ठाकरे यांना पुढे केले आहे. आदित्य ठाकरे यांनी जनाआशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवल्यास ते ठाकरे घराण्यातील पहिले व्यक्ती असतील. आजपर्य़ंत ठाकरे घराण्यातील कोणत्याही व्यक्तीने निवडणूक लढवली नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी देखील कोणतीही निवडणूक लढवली नाही. मात्र, आता विधानसभेच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे हे निवडणूक लढले तर ते पहिले व्यक्ती असतील. त्यामुळे ही विधानसभा निवडणूक ही ठाकरे घऱाण्यासाठी प्रतिष्ठेची आहे.

Visit : Policenama.com