मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक, मुख्यमंत्री महत्वाचा निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सुप्रीम कोर्टात २७ जुलैपासून मराठा आरक्षणावर दररोज सुनावणी होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षण उपसमितीची आढावा बैठक बोलवली आहे. बैठकीस समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असणार आहेत. कोर्टाच्या भूमिकेनंतर मराठा आरक्षण टिकवण्यासाठी आता ठाकरे सरकारने मोर्चेबांधणी सुरु केल्याचं दिसत आहे.

यापूर्वी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांनी १६ जुलै रोजी मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा उपसमितीची बैठक बोलावली होती. तेव्हा संभाजीराजे छत्रपती आणि मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी मांडलेले मुद्दे देखील या बैठकीत मांडले गेले. राज्य सरकार मराठा आरक्षण कोर्टात टिकवण्यासाठी कसून प्रयत्न करत असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्य सरकारची बाजू भक्कम असावी यासाठी कोणत्याच उणीवा ठेवू नये. सर्व कायदेशीर पूर्तता करण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करायचे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली होती.

न्यायमुर्ती एन. नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली १५ जुलै रोजी मराठा आरक्षण आणि वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशाच्या बाबत तीन सदस्यीय खंडपीठासमोर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. या चौथ्या सुनावणीमध्ये ‘आतापर्यंत मराठा आरक्षणावर अंतिम निर्णय देत असताना ३ ते ४ वेळा दिलासा देण्यात आला. त्यामुळे यात अजून किती बदल करायचं आहे.’ असा सवाल न्यायाधीशांनी उपस्थितीत केला होता. म्हणून २७ जुलै पासून या प्रकरणाची दररोज सुनावणी घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने घेतला. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. हा खटला ३ न्यायाधीश यांच्या समोर चालवावा की, ५ न्यायाधीश यांच्यासमोर चालवावा याबद्दल राज्य सरकारची भूमिका काय यावरती निर्णय होण्याची शक्यता आहे.