मुख्यमंत्री त्यांच्या अनुमतीशिवाय निर्णय घेऊ शकत नाही : मुनगंटीवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी शेतकऱ्यांच्या 25 हजाराच्या मदतीच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणात राज्यासाठी कोणतेही ठोस आश्वासन नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. त्यानंतर माजी मंत्री आणि भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, अभिभाषणावर जे मुद्दे उपस्थित करण्यात येतात त्याचे उत्तर मिळणे अपेक्षित असते. मात्र, आज राज्यपालांच्या अभिभाषणावर आम्हाला मुख्यमंत्र्यांचे डमी भाषण ऐकायला मिळाले. कारण मुख्यमंत्री हे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनुमतीशिवाय एक पाऊल पुढे जाऊ शकत नाहीत. तसेच त्यांना परवानगी घेतल्याशिवाय निर्णय देखील घेता येत नाहीत. उद्धव ठाकरे यांना निर्णय घेण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची परवानगी घ्यावी लागते. तसेच शरद पवार यांची देखील अनुमती घ्यावी लागते असे मुनगंटीवार म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी एक डमी मुख्यमंत्री म्हणून नाही तर एक झुंझार मुख्यमंत्री म्हणून काम करायला पाहिजे. तसेच त्यांच्याकडून आज जे उत्तर अपेक्षित होते, ते आम्हाला मिळाले नसल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. तर शेतकऱ्यांच्या मुद्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन भूमातेच्या साक्षीने व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत 25 हजार मदत देण्याचे आश्वासन दिले होते. दिलेले आश्वासन त्यांनी पाळावे असे मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

फेसबुक पेज लाईक करा –  https://www.facebook.com/policenama/