कुठे गेला हिमालय अन् कुठे गेले ते काळे तोंड ? : उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन – शरद पवारांनी राजीव गांधींना दगा दिला होता. त्यावेळी तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही असे म्हंटले होते. कुठे गेला हिमालय ? कुठे गेले ते काळे तोंड.? अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. नाशिक येथील जाहीर सभेत त्यांनी हे वक्तव्य केले.

नाशिक लोकसभा मतदार संघाचे युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला. सीमेवर जवान लढत आहेत. आणि अश्यावेळी सत्तेत जर नेभळट सरकार आले तर परिस्थिती बिघडेल. जर नेतृत्वच कचखाऊ असेल तर सैन्य काही करु शकत नाही. आदेश मिळाले नाही तर सैन्यदेखील काही करु शकत नाही. असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, विरोधकांवर निशाणा साधताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत राजीव गांधी यांना देखील दगा दिला होता. त्यावेळी त्यांना त्यासंदर्भात विचारले असता, मी एक वेळ तोंडाला काळे फासून हिमालयात निघून जाईन पण पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. असे त्यांनी म्हंटले होते. मग कुठे गेला हिमालय ? आणि कुठे गेले ते काळे तोंड. ? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी केला.