‘भाजपाची पालखी कायम वाहणार नसल्याचा शब्द बाळासाहेबांना दिला होता’, उध्दव ठाकरेंनी सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या चौथ्या दिवशी सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. काल देवेंद्र फडणवीसांनी सामना वृत्तपत्राच्या आधारे शिवसेनेला चांगलेच धारेवर धरले होते. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या जिवावर सेनेचा मुख्यमंत्री बनवू, असा शब्द बाळासाहेबांना दिला होता का?’, असा प्रश्न काल फडणवीसांनी विधानसभेत विचारला होता.

या सर्व प्रश्नांना आज उद्धव ठाकरे यांनी उत्तरे देत फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला. उद्धव ठाकरे म्हणाले, दिलेल्या शब्दाचं कौतुक फडणवीस तुम्हाला कधीपासून झालं?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. तसेच वडिलांना दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईन, आणि मी त्या थराला जाऊन करून दाखवलं. तसेच मी बाळासाहेबांना अजून एक शब्द दिला होता तो म्हणजे ‘भाजपाची पालखी कायम वाहणार नाही’ आणि तसे ही करून दाखवलं. असे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले.

तसेच आज अधिवेशनात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर प्रश्नांची सरबत्ती केली आणि तुमचे सरकार असताना तुम्ही काय केलं असा देखील केला. उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही दिलेले वचन नेहमी पाळतो आणि यापुढेही पाळत राहणार. बाळासाहेबांना दिलेले वाचन आम्ही पूर्ण केले असून सुरु असलेला संसार हा भाजपानेच मोडला आहे. असे देखील त्यांनी सांगितले.

तसेच उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यावर कर्जाचा मोठा डोंगर भाजपच्या काळात झाला आहे. त्यामुळे देशाची आर्थिक स्थिती ही फार बिकट असून मेक इन इंडियात किती करार झाले? गुंतवणूक आली पण पुढे काय झालं ?, इतर देशातील हिंदू घ्या, पण त्यांना ठेवणार कुठे, निर्वासितांची काळजी वाहणार कोण ? असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. तसेच त्यांनी फडणवीसांवर जोरदार निशाणा साधत सवाल उपस्थित केला की सीमाभागातील मराठी बांधव इतके आक्रोश करत आहेत, तुमचं सरकार असताना तुम्ही काय केलं? असे विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

तसेच उद्धव म्हणाले की हे गरिबांचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या तीन चाकी रिक्षा सरकार असल्याच्या टीकेवर गरिबांना बुलेट ट्रेन नाही, तर तीन चाकी रिक्षाच परवडत असते असा त्यांनी पलटवार केला. तसेच महाविकासआघाडीचे सरकार स्थगिती सरकार नसून प्रगतीचं सरकार आहे. दरम्यान भाजपाने सभागृहात शेतकऱ्यांना हेक्टरी २५,००० रुपयांची मदत जाहीर करण्याची मागणी केली होती. अशा अनेक आरोप- प्रत्यारोपनंतर अखेर भाजपाने सभात्याग करण्याचा निर्णय घेतला.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/