बारामतीची ‘भानामती’ आता चालणार नाही : उद्धव ठाकरे

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात भगवं तुफान उसळलं आहे. ही भगवी मने महाआघाडीचा पराभव करणार आहेत. बारामतीची भानामती आता इथं चालणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जनतेने महापालिका, विधानसभेतून कधीच हद्दपार केले आहे. त्यामुळे आता महायुतीने ठरवले आहे ‘पुन्हा एकदा केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार येणार’; असे मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. गुरुवारी काळेवाडी फाटा येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत ठाकरे बोलत होते.

ठाकरे म्हणाले, “महायुती होण्यापूर्वी आघाडीचे नेते लाकडी घोड्यावर बसून दिल्लीला निघाले होते. पण महायुती होताच त्यांचे लाकडी घोडे मोडून पडले. महायुतीचे ठरले आहे, ‘देशद्रोह्यांना फाशी द्यायची, घटनेतील 370 कलम रद्द करायचं, पाकिस्तानचं कंबरडं मोडायचं’. विरोधकांकडे देश विकासाची कोणतीही दिशा नाही. त्यांच्याकडे सक्षम उमेदवार देखील नाही. त्यांचा केवळ नरेंद्र मोदी आणि महायुतीला विरोध आहे. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मागील पाच वर्षात देशाच्या संसदेत उत्तम काम केले आहे. त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा पुस्तक रुपाने मांडला आहे. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. श्रीरंग बारणे यांच्यावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप नाही. निवडणुकीच्या तोंडावर विरोधक भेटीगाठी घेत आहेत. राष्ट्रवादीची ही दादागिरी जनता मोडून काढणार आहे. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार आहे, असेही ठाकरे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घराणेशाहीच्या माध्यमातून घरातील उमेदवार उभा करत आहे. हा माझा भारत देश म्हणजे पवारांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. हा सर्वसामान्य जनतेचा देश आहे. या देशातून सर्वसामान्यांचेच प्रतिनिधी जायला हवेत. घराणेशाहीला इथे थारा नाही असे ठाकरे म्हणाले.