मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ‘इथले’ आमदार होणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचा राज्यकारभार आज उद्धव ठाकरेंनी स्वीकारला. राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले. परंतू उद्धव ठाकरे हे आमदार नाहीत. त्यामुळे घटनेनुसार त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सहा महिन्याच्या आत विधीमंडळाचे सदस्य होणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत विधानसभा किंवा विधानपरिषदेत मुख्यमंत्र्यांना आपले सदस्यत्व सिद्ध करावे लागते. त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेतून आमदार होणार असे खात्रीलायक सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यासाठी ते यवतमाळ विधानपरिषदेतून निवडणूक लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेची यवतमाळ जिल्ह्यावर चांगली पकड आहे. या कारणाने उद्धव ठाकरे यवतमाळ मतदारसंघातून चाचपणी करत आहेत. याआधी शिवसेनेचे नेते तानाजी सावंत हे यवतमाळ विधान परिषदेचे सदस्य होते. परंतू ते आता विधानसभेतून निवडणूक आले आहेत. त्यामुळे ही जागा आता रिक्त आहे. या कारणाने यवतमाळ विधानपरिषदेमधून उद्धव ठाकरे निवडणूक लढवतील अशी शिवसेनेच्या गोटात चर्चा आहे.

तानाजी सावंत जेव्हा येथून निवडून आले होते तेव्हा त्यांना 378 मतं मिळाली होती. त्यानंतर या जागेवर शिवसेनेचा भगवा फडकला. या मतदारसंघात एकूण 439 मतदार आहेत. त्यामुळे हा मतदारसंघ सुरक्षित मानला जातो. याच कारणाने उद्धव ठाकरे येथून निवडणूक लढवण्याची चाचपणी करत आहेत. यवतमाळमधून निवडणूक लढवावी अशी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची देखील मागणी आहे.

शिवसेनेच्या विदर्भातील नेत्यांमध्ये चर्चा सुरु आहे की उद्धव ठाकरे यवतमाळमधून विधानपरिषदेवर निवडून गेले तर विदर्भातील लोकांना आनंद होईल, शिवाय ते थेट विदर्भाशी जोडलेले राहतील.

Visit : Policenama.com