बेरोजगारी, आर्थिक मंदीचे मुळ नोटबंदीच्या निर्णयात, उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींवर टीका

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयावर उद्धव ठाकरे यांनी थेट सामनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. पी. चिदंबरम यांच्यावर कारवाई करणारे सरकार विजय मल्ल्या आणि निरव मोदीबाबत गप्प का ? देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय ? अशा प्रकारचे अनेक सवाल सामनातून उपस्थित करण्यात आलेले आहेत.

काय म्हणलंय नेमकं सामनामधून –

मंदी आणि बेरोजगारीचे मूळ नोटाबंदीच्या निर्णयात आहे. सीतारमण सांगतात तो भ्रष्टाचार नोटाबंदीनंतरचा म्हणजे गेल्या साडेतीन वर्षांतला आहे. मात्र हे सांगताना त्यांनी हा भ्रष्टाचार नेमका कोणी केला याचे दाखलेही द्यायला हवेत.

चिदंबरम यांच्याबाबतीत जे युद्ध सीबीआय व ईडी आज करीत आहे ते निरव मोदी, मल्ल्या किंवा इतरांच्या बाबतीत झाले नाही. चिदंबरम यांना बांबू लावला तसा इतर मंडळींनाही तो लावला तरच भ्रष्टाचारास बूच बसेल.

ममता बॅनर्जी यांच्या सहकाऱ्यांनी ‘शारदा चिट फंड घोटाळा’ केला. हा भ्रष्टाचार आहेच. त्या भ्रष्टाचाराचे मुख्य सूत्रधार मुकुल राय हे मात्र मुक्त संचार करीत आहेत.

नोटाबंदीनंतर देशात चलनातील रोकड वाढली असून याचा थेट संबंध बेकायदेशीर कामांशी आहे. 4 नोव्हेंबर 2016 ला देशात 17,174 बिलियन रुपयांचे रोख सर्क्युलेशन होते. तेच आता 29 मार्च 2019 ला वाढून 21,137 बिलियनपर्यंत पोहोचले. म्हणजे चलनातील वाढलेली रोकड संशयास्पद आहे.

पैशांचा काळाबाजार व भ्रष्टाचार हा सहमतीने होत असतो. लोकसभा सचिवालयाच्या अंतर्गत ‘नॅशनल इन्फोर्मेटिक्स सेंटर’ आहे. या संस्थेने नोटाबंदीनंतरच्या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आहे.

सरकार अधिकारावर येताच एक एक घुसखोर पकडून बाहेर काढू या घोषणेप्रमाणेच भ्रष्टाचार निर्मूलनाच्या घोषणेचे काय झाले? मोदी यांनी ‘नवा भारत’ म्हणजे ‘Modern India’ ची घोषणा केली तो ‘भारत’ सगळय़ांची काळजी घेणारा असावा हे स्वप्न होते, पण नव्या भारतात गेल्या दोन वर्षांत दोन कोटींवर लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या.

देशाच्या अर्थव्यवस्थेचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार सुरू आहेत काय ? ते लवकरच दिसेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केलेल्या अनेक घोषणा तसेच घेतलेले नोटबंदीसारखे अनेक निर्णय असे फोल ठरले या बाबतच्या असनेक गोष्टींवरील सवाल शिवसेनेनं थेट सामनाच्या माध्यमातून उपस्थित केले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –