चांगल्या योजना सरकार बंद करतंय, उध्दव ठाकरे सुडाचं राजकारण करतायत : माजी कृषिमंत्री अनिल बोंडे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सत्तापालट झालाय. आता महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर नव्या सरकारने मागच्या सरकारने घेतलेले अनेक निर्णय व योजनांना ब्रेक लावला आहे. भाजप नेते आणि माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी या मुद्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “जलयुक्त शिवार या प्रकल्पाला स्थगिती देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुडाचं राजकारण करत आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले चांगले काम पुसून टाकण्याचा हा अट्टाहास आहे,” असा आरोप माजी कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी केला आहे.

“जलयुक्त शिवार योजना थांबवणं. त्याला स्थगिती देणे, निधी बंद करुन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश काढणे ही अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आणि ग्रामीण भागातील जनतेच्या तोंडचं पाणी पळवणारी ही बाब आहे. आता ही योजना फक्त रोजगार हमी योजनेत टाकल्याने पुढील ५ वर्षात होणाऱ्या कामांना २५ वर्षे लागतील.” असेही अनिल बोंडे यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना म्हणून ओळखली गेलेली जलयुक्त शिवार योजनेला या सरकारने ब्रेक लावले आहे. कारण, ३१ डिसेंबरला या योजनेची मुदत संपल्यानंतर नव्या सरकारने त्यास मुदतवाढ दिलेली नाही. यापुढे या योजनेस निधी न देण्याची भूमिका घेतली आहे. रोजगार हमी योजनाव्यतिरिक्त जलयुक्तसाठी एखाद्या अधिकाऱ्याने निधीची तरतूद केली तर तो गैरव्यवहार केला असे समजून कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश सुद्धा देण्यात आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/