ठाकरे सरकारचा देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का, बंद केली ‘ही’ महत्वाची योजना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणखी एक महत्त्वाची योजना बंद केली आहे. आणीबाणीच्या काळात तुरूंगवास भोगलेल्या व्यक्तींसाठी देवेंद्र फडणवीस सरकारने मानधन योजना सुरु केली होती. मंत्रिमंडळाच्या निर्णयाआधारे उपसचिव सु.म. खाडे यांनी यासंबंधीचे परिपत्रक काढले आहे. अर्थात, कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचे कारण यासाठी देण्यात आले आहे.

आणीबाणीच्या काळात ज्यांनी तुरुंगवास भोगला अशा कार्यकर्त्यांना फडणवीस यांनी पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय भाजपच्या वैचारिक तत्वांना पुढे ठेवून निर्णय घेण्यात आला होता. ठाकरे सरकारने तोच निर्णय फिरवल्याने हा भाजप आणि देवेंद्र फडणवीसांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याच्या निर्णयाविरोधात भाजपसह त्यावेळच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेत आंदोलन केले होते. आणीबाणी ही लोकशाहीची हत्या होती असा आरोप करत भाजप अजूनही काँग्रेसला टार्गेट करत असते. त्यामुळे काँग्रेसचा या योजनेला विरोध होता. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. या आधीही ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले होते. सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनीच काँग्रेसच्या मंत्र्यांनी या योजनेला विरोध केला होता. त्यामुळे या योजनेचं भवितव्य अधांतरीच होतं.

जुलै 2018 मध्ये ही योजना मंजूर करण्यात येऊन जानेवारी 2018 पासूनच त्याचा लाभ देण्यात आला. 1975 ते 1977 मधील आणीबाणीच्या कालावधीत तत्कालीन सरकारविरुद्ध लोकशाहीसाठी लढा देताना तरुंगवास भोगलेल्यांसाठी ही योजना होती. एक महिन्यापेक्षा जास्त कारावास भोगलेल्या व्यक्तिंना मासिक 10 हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस 5 हजार रुपये व एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्या व्यक्तिंना मासिक 5 हजार व त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीस किंवा पतीस अडीच हजार रुपये मानधन सुरु करण्यात आले होते.