CM ठाकरेची आजची मुलाखत म्हणजे माझा सामना, माझी मुलाखत ; मनसे नेते संदीप देशपांडे यांची टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त सेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात प्रसिद्ध झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या मुलाखतीबाबत मनसेने जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांची सामनामधील मुलाखत ही माझा सामना, माझी मुलाखत या प्रकारातील होती. ते सपशेल अपयशी ठरले आहेत. ते फेसबुक लाईव्हमध्येही सामान्यांच्या हिताचे काही बोलले नव्हते. जर उद्धव ठाकरेंच्या धमन्यांमध्ये हिंदुत्वाचे रक्त असेल, तर ते दिसत का नाही. वीजबिल, बेरोजगारीसारख्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर ते का बोलत नाहीत, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे (MNS leader Sandeep Deshpande) यांनी केली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर खा. संजय राऊत यांनी घेतलेली मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनात शुक्रवारी (दि. 27) प्रसिद्ध झाली आहे. मुलाखतीमधून राज्यातील विरोधी पक्ष असलेल्या भाजपास जोरदार टोला लगावला आहे. या मुलाखतीवर देशपांडे यांनी टीका केली आहे. या मुलाखतीमधून केवळ भाजपला धमकवण्याचे काम झाल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीमधून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी शांत संयमी आहे. पण याचा अर्थ असा नाही की मी नामर्द आहे. ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या कुटुंबीयांवर हल्ले सुरू झाले आहेत, ही पद्धत निदान महाराष्ट्राची तरी नाही. दोन दिवसांपूर्वी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, त्यावेळी त्यांच्या मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

यावरूनच उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारला अप्रत्यक्षपणे ठणकावले आहे. तुम्ही सीबीआयचा दुरुपयोग करायला लागलात, तेव्हा अशी वेसण घालावीच लागेल. ईडी काय, सीबीआय काय, त्यावर राज्याचा अधिकार नाही? असा सवालही उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. आम्ही देतो नावे, नाव मालमसाला तयार आहे, पण सूडाने जायचं का?. मग जनतेने आपल्याकडून काय अपेक्षा ठेवायची, सूडानेच वागायचे असेल तर तुम्ही एक सूड काढा आम्ही दहा सूड काढू, असा दमच उद्धव ठाकरेंनी भाजप नेत्यांना भरला आहे.

You might also like