CM उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना आणखी एक ‘धक्का’, घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपला बाजूला ठेवत नव्यानं सत्तेत आलेल्या उद्धव ठाकरे सरकारनं भाजपच्या फडणवीस सरकारचे अनेक निर्णय बदलण्यास सुरुवात केली आहे. सत्तेत येताच शिवसेनेनं मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली. यानंतर आता गुजरातच्या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला दिलेलं 321 कोटींचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे. घोड्यांच्या आंतरराष्ट्रीय जत्रेच्या आयोजनाचं कंत्राट फडणवीस सरकारनं गुजरातमधील कंपनीला दिलं होतं. यात गंभीर स्वरुपाची आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं 26 डिसेंबर 2017 रोजी अहमदाबादमधील लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबत करार केला. त्यामुळे नंदूरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक फेस्टीव्हलच्या व्यवस्थापनाचं कंत्राट कंपनीला मिळालं. परंतु राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यानंतर पर्यटन विभागानं लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबतचा करार ताबडतोब रद्द केला. मुख्य सचिव अजॉय मेहता यांनी याबद्दलचे आदेश काढले आहेत. यापूर्वीही याच कंपनीला रण उत्सव आणि कुंभमेळ्याचंही कंत्राट मिळालं होतं.

याबाबत पर्यटन विभागाचे अप्पर सचिव एस. लंभाटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “लल्लूजी अँड सन्स कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आलं आहे. याशिवाय कंत्राटमध्ये आर्थिक अनियमितता असल्याचंही आढळून आलं आहे.”

एमटीडीसीकडून डिसेंबर महिन्यात दरवर्षी घोड्यांच्या जत्रेचं आयोजन केलं जातं. 2016 पासून या जत्रेचं आयोजन आंतरराष्ट्रीय स्तरावर केलं जात आहे. देशातल्या अनेक जुन्या जत्रांपैकी एक अशी ही जत्रा आहे.

Visit : policenama.com