दूध दरवाढीबाबत ‘ठाकरे सरकार’ घेणार मोठा निर्णय ? मंत्र्यांच्या उपस्थिती बैठक सुरू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शेतकऱ्यांच्या दुधाला दरवाढ मिळावी या मागणीसाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलने सुरु आहेत. राज्यात भाजप, स्वाभिमानीसह अनेक संघटना रस्त्यावर उतरल्या असून त्यांच्याकडून आंदोलन करण्यात येत आहे. दूध रस्त्यावर फेकून देत सरकारच्या विरोधात आक्रमक आंदोलन सुरु आहे. सरकारने या आंदोलनाची दखल घेतली असून दूध दरवाढीबाबत महत्त्वपूर्ण बैठक सध्या सरु आहे. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु असून अनेक दूध उत्पादक शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला हजर आहेत.

दुधाचा दर वाढवून मिळावा, या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरु आहे. त्यामुळे ठाकरे सरकारने या मागणीबाबत विचारमंथन सुरु केलं आहे. मंत्री सुनिल केदार यांच्या उपस्थितीत ही बैठक होत असून या बैठकीला महानंदाचे अधिकारी देखील उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीत नेमका काय निर्णय घेतला जातो, याकडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

दरम्यान, आजच्या बैठकीत गाईच्या दुधाला 10 रुपये अनुदान द्यावे ते शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पद्धतीने जमा केले जावे. मग ते दूध शेतकरी सहकारी संस्थेला देत असेल किंवा मग ते खासगी दूध संघाला देत असेल. याशिवाय दूध भूकटीलाही 50 रुपये अनुदान देण्यात यावे हा निर्णय आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांच्या संघर्षाला, एल्गाराला सरकारला 1 ऑगस्ट रोजी सामोरे जावे लागेल, असा इशारा माजी कृषीमंत्री आणि भाजप किसान मोर्चा अध्यक्ष अनिल बोंडे यांनी दिला आहे.