ठाकरे सरकार योजना बंद करत सुटलंय का ? जयंतपाटलांनी केला ‘हा’ मोठा खुलासा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली. ठाकरे सरकारने सत्ता हातात येताच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरु केलेल्या योजना बंद करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे भाजपने ठाकरे सरकारवर टीका केलीय. हे सरकार फक्त योजना बंद करत सुटलंय अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. सरकारने योजना बंद करत विकासाला खिळ घालू नये, असं मतही त्यांनी व्यक्त केले होते.

भाजपने केलेल्या आरोपांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, सरकारने कोणत्याही योजना बंद केलेल्या नाहीत. फक्त काही योजनांचा आढावा घेतला असल्याचा खुलासा त्यांनी केला. तसेच वादाच्या अनेक विषांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. जयंत पाटील यांनी सरपंच निवड, मुख्यमंत्री आणि मोदी भेट, एनपीआर, एल्गार परिषद, खडसे चौकशी यावर खुलासा केला.

एल्गार परिषदेवर बोलताना जयंत पाटील म्हणाले, एल्गार शनिवार वाड्यासमोर झाली. त्याच्या भाषणांचा भीमा कोरेगावच्या घटनेचा काही संबंध नाही. तरी देखील एल्गार परिषदेच्या काही लोकांवर आरोप ठवून त्यांची चौकशी करण्यात आली. जेव्हा एसआयटी नेमणार अशी चर्चा झाली त्याच दिवशी एनआयएने तपास आपल्याकडे घेतला. त्यामुळे आमच्या मनात शंका आली मात्र तपास केंद्राकडे गेला तरी राज्य सरकार एसआयटी कडून चौकशी करू शकते.

सरपंच निवड – ग्रामविकास विभागाचा सरपंच निवडीचा कायद्यातला बदल राज्यपालांना कळवलं आहे. त्यांनी तो निर्णय घेतलेला नाही. त्यांनी विधी मंडळात कायदा मांडून मंजूर करावा असे सांगले असून त्याप्रमाणे करु. त्यांच्याविषयी काही बोलणे योग्य नाही. त्यांचा सन्मान राखणे ही आमची जबाबदारी आहे. केंद्र सरकारने आमचे सरकार आल्यापासून जीएसटीचा फरक उशिरा द्यायला सुरुवात केली. कारण त्यांची आर्थिक अवस्था बरी नाही. ते मुद्दाम करतात असा आरोप नाही. केंद्र आणि राज्यात संवाद व्हावा यासाठी मुख्यमंत्री पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार आहेत.

शिवसेना हा आघाडीतील पक्ष आहे. आमच्यात आणि शिवसेनेत कोणताही मतभेद नाही. मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळातले प्रश्न प्रश्नावलीत सहभागी करू. मात्र, एनपीआर बाबत कोणतेही मतभेद नाहीत. गणती करण्यात कोणाचा विरोध असण्याचे कारण नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.