Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्र सरकारनं केली केरळकडे ‘ही’ विनंती

पोलीसनामा ऑनलाईन टीम – राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकारही धास्तावले आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याही 1 हजार 635 पर्यंत जाऊन पोहचली आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने आता केरळ सरकारकडे मदतीचा हात मागितला आहे. कोरोनाशी यशस्वी लढा दिलेल्या डॉक्टर आणि नर्सेसना राज्यात पाठविण्याची विनंती राज्य सरकारतर्फे पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

केरळमध्ये कोरोनाचा प्रसार रोखण्यात सरकार आणि यंत्रणेला आलेल्या यशानंतर, आता तोच प्रयोग महाराष्ट्रातही करण्यासाठी पसंती दिली जात आहे. सध्या मुंबई आणि पुणे शहरांतील रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या आटोक्यात आणण्यासाठी केरळमध्ये कोरोनाशी मुकाबला करणारे हे डॉक्टर्स आणि नर्सेस उपयोगी ठरतील अशी सरकारला आशा आहे. भविष्यात मुंबई, पुण्यासारख्या महानगरांमध्ये रुग्णांची वाढती संख्या रोखण्याचा सर्वोतपरी प्रयत्न सध्या राज्य सरकारकडून सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात कोरोना बाधितांची संख्या वाढणार असल्याचे संकेत दिले होते. संख्या वाढणार असली तरी काळजीचे कारण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यात काल तब्बल 3 हजार 41 रुग्णांची भर पडली. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 50 हजार 231 एवढी झाली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 1 हजार 635 जणांचा मृत्यू झाला आहे. समाधानाची बाब म्हणजे राज्यात आत्तापर्यंत 14 हजार 600 जण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.