CM काल म्हणाले – नाईट कर्फ्यू कशाला ?, आज लागू केला !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी (दि.20) दुपारी फेसबुकच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात पुन्हा लॉकडाऊनची (Lockdown) गरज मला वाटत नाही. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर असल्याचे सांगितले. तसेच नाईट कर्फ्यू (Night Curfew), लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण ते का करायचं ? असा सवाल करत असे काही होणार नसल्याचे संकेत दिले. मात्र काही तासात त्यांनी युटर्न घेत उद्या संध्याकाळपासून संचारबंदी लागू केली.

केंद्र सरकारने ब्रिटनहून येणारी विमाने 23 तारखेपासून बंद केली आहे. मात्र आज आणि उद्या मुंबईत 5 विमाने येणार आहेत. यामध्ये अंदाजे एक हजार प्रवाशी असतील. त्यांच्यासाठी ताज, ट्रायडंट आदी हॉटेलमध्ये दोन हजार रुम बुक करण्यात आले आहेत, असे माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी दिली.

दरम्यान, सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केंद्र सरकारने पुरेशी काळजी घेतल्याचे म्हटले होते. अशातच ब्रिटनच्या धर्तिवर कोणत्याही राज्याने अद्याप नाईट कर्फ्यूचे पाऊल उचलेले नाही. यामुळे ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारी त्यांना ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेन आणि तेथील लॉकडाऊनची माहिती होती. याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला होता. तसेच पहिल्या लॉकडाऊननंतर राज्यातील वाढलेल्या कोरोना रुग्णांवरुन राजकारण सुरु झाले होते. यावेळी ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केंद्र सरकारला जबाबदार धरत परदेशातून येणाऱ्या विमानांबाबत काहीच माहिती दिली नसल्याची टीका केली होती.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
फेसबुक लाईव्हमध्ये उद्धव ठाकरेंनी म्हटले होते की, मी आजपर्यंत जे जे आपल्याला सांगत आलो, ते ते आपण मनापासून अमलात आणत गेलात आणि म्हणूनच मी म्हणेन की आजच्या परिस्थितीवर आपण पूर्णपणे काबू मिळवला नसला तरी काही प्रमाणात नक्कीच नियंत्रण मिळवलं आहे. पण अजूनही आपण धोक्याच्या वळणावर आहोत. नाईट कर्फ्यू, लॉकडाऊन कायद्याने लावू शकतो. पण ते का करायचं ? 70-75 % लोक चेहऱ्यावर मास्क घालून फिरत असतात. पण उरलेल्यांना मी सूचना देतो की आपण बंधनं पाळा. मला असं वाटतं की आजार आणि इलाजापेक्षा काळजी घेतलेली बरी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.