उध्दव ठाकरे राजकारणातील हरिश्चंद्र, गोरगरीब अन् शेतकर्‍यांसाठी झटणार्‍या ‘या’ आमदारानं सांगितलं

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना राजा हरिश्चंद्रांची उपमा देण्यात आली आहे. प्रहार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंना राजकारणातील हरिश्चंद्र म्हणत कौतूक केले आहे. आज झालेल्या बहुमत चाचणीत महाविकासआघाडीने विश्वासदर्शक ठरावं जिंकला.

महाविकासआघाडीला 169 चे बहुमत मिळाले तर विरोधात एकही मत पडले नाही, कारण भाजपने सभा त्याग केला. चार आमदारांनी तटस्थ राहणे पसंत केले. सभात्याग केलेल्या भाजपने अधिवेशन नियम बाह्य असल्याचा आरोप लावला. सभागृहात दादागिरी नही चलेगी अशाही घोषणा दिल्या.

त्यानंतर अनेक आमदारांनी आपली मते मांडली. यावेळी बच्चू कडू यांनी देखील आपल्या भावना मांडल्या. ते म्हणाले की उद्धव ठाकरे हे राजकारणातील हरिश्चंद्र आहेत असे मी मानतो, उद्धव ठाकरे शब्दाला जागणारे असून बाळासाहेबांकडून त्यांना राजकारणातील बाळकडू मिळाले आहे, मी त्यांचे अभिनंदन करतो.

तर भाजपला राग का येतो –
जयंत पाटलांनी बहुमत सिद्ध झाल्यानंतर भाजपवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाच्या शपथविधीदरम्यान जर उल्लेख केला तर भाजपला राग का यावा. भाजपला महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांच्याबद्दल असूया आहे.

पाटील म्हणाले की उद्धव ठाकरे आज पहिल्यांदाच विधीमंडळातील सभागृहात आले. विरोधी पक्षाने त्यांचा मान राखणं आवश्यक होतं, परंतू तसं झालं नाही. यावेळी जयंत पाटलांनी हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांचे आभार मानले. घोडेबाजाराला वाव न दिल्यामुळे त्यांनी अध्यक्षांचे आभार मानले. पुढील पाच वर्षात घोडेबाजार होऊ देणार नाही असा विश्वास यांनी व्यक्त केला.

शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. परंतू अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार हंगामा करण्यात आला. भाजपकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवर देखील आक्षेप घेतला. त्यानंतर भाजपने आमदारांकडून सभात्याग केला. परंतू शपथविधीचा विषय राज्यपालांच्या अखत्यारित विषय असून त्यावर आपण भाष्य करणार नाही असे हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

Visit : Policenama.com